वाचाल तर वाचाल!

‘वाचाल तर वाचाल’ असं आपण अनेकदा ऐकतो अन् ते खरंही आहे. खूप खूप वाचवं, चांगलं साहित्य नजरेखालून घालावं असं आपल्याला ब-याचदा वाटतं. पण काय वाचावे, सुरूवात कशी करावी असा प्रश्नदेखील पडतो. म्हणूनच ही ५ उत्कृष्ट पुस्तके खास तुमच्यासाठी आम्ही निवडली आहेत. आवर्जून वाचा, तुम्हाला नक्कीच आवडतील!

1. लढे अंधश्रद्धेचे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देऊन महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही विवेकवादाची रुजवण केली. त्यासाठीच त्यांनी बलिदानही दिले. सामान्य लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा उठवणा-या भोंदू साधूंची, बुवां-बायांची प्रकरणे दाभोलकरांनी उघडकीस आणली. ज्योतिष, वास्तूशास्त्र, पुत्रप्राप्तीचे चमत्कार, नाडी भविष्य अशा अनेकानेक अंधश्रद्धांना दाभोलकरांनी चाप लावला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे जे महत्त्वाचे लढे दिले त्यावर आधारित लेखांचे हे पुस्तक. मानवतेची आणि विवेकवादाची कास धरणा-या प्रत्येकाने हे लेख वाचायलाच हवेत.

2. सभेत कसे बोलावे? – आपल्या अंगी नेतृत्व गुण असावे, आपल्या बोलण्यातून समोरची व्यक्ती प्रभावित व्हावी, सभेत बोलताना लोकांनी आपल्या बोलणं लक्षपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं; पण बोलायची भीती वाटते. मग हे पुस्तक तुमच्यासाठीच… कारण या पुस्तकात सभेत प्रभावीपणे बोलता येण्यासाठी आवश्यक तंत्र, मंत्र आणि उपाययोजना दिल्या आहेत. वक्तृत्व म्हणजे काय, भाषणाचा विषय, त्याची सुरुवात आणि शेवट असे अनेक मार्गदर्शक मुद्दे यात आहेत. सोबतच श्रोत्यांची मने जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्सही आहेत.

3. शिवाजी कोण होता? – छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण गोविंद पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा’ कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी’चा राजा होता, ते या पुस्तकातून दाखवून दिलं आहे. इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.

4. शेरलॉक होम्सः द व्हॅली ऑफ फिअर – डिटेक्टिव्ह, हेरगिरीच्या कथा ज्यांना आवडतात, त्यांना ही कादंबरी नक्कीच खिळवून ठेवेल. डोक्यावर हॅट, ओठांमध्ये चिरूट, हातात काठी अशा वेशभूषेतील शेरलॉक होम्स ‘बऱ्याचदा सत्य कल्पनेपेक्षा थरारक असतं,’ असं सांगतो. अमेरिका आणि युरोपशी संबंधित या कथेत शेरलॉक होम्स त्याच्या तीक्ष्ण बुद्धीच्या साह्याने अत्यंत अवघड कोडे सोडवितो. भयाच्या, भीतीच्या या दरीत खोल बुडी मारून सत्य शोधून काढण्याच्या त्याच्या रोमांचकारी प्रवासात तुम्हीही सामील झाल्याचा भास तुम्हाला होईल, अशी ही कांदबरी.

5. चाणक्यनीती – आजच्या जगात मॅनेजमेंट हा जणू परवलीचा शब्द झालाय, इतकं अपार महत्व ह्या शब्दाला आलंय. मेहनत करणाऱ्या, काम करणाऱ्या व्यक्तीला आजच्या घटकेला अनंत संधी उपलब्ध होताहेत आणि अनेक नव्या वाटा त्याच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण होताहेत. शिवाय त्याच्या कर्मफलाची प्राप्तीही त्याला लगोलग मिळते आहे. हाती आलेल्या संधीचं सोनं करायला मात्र मनुष्याच्या अंगी धडाडी नी चातुर्यही तसंच असावं लागतं. आर्य चाणक्यांनी मानवी जीवनाचे आदर्श या पुस्तकांत मांडले आहेत. जीवनाच्या प्रत्येक बाजूकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. धर्म, शिक्षण, संस्कृती, विदवान, समाज, शांतता, न्याय, कुळ असे अनेक विषय त्यांनी हाताळले. त्यांच्या विचारांचा अर्थासहित संग्रह म्हणजे `व्यवहार्य उपयोगासाठी चाणक्यनीती’ हा होय.

collage

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s